साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बळकट करा -शरद पवार

0
7
विशेष प्रतिनिधी
ज्ञानोबा-तुकोबा साहित्यनगरी, पिंपरी-चिंचवड (पुणे)- साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीत माझा हात होता अशी अफवा पसरली होती. महाराष्ट्रात काहीही झाले तरी माझा त्यात हात होता असे सांगण्याची पद्धत आता रुढ झाली आहे. लातूर किंवा कोयनेत भूकंप झाला तरी माझे नाव घेतले जाईल की काय अशी परिस्थिती आहे. सबनिस यांची निवड झाल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो. त्यामुळे या केवळ चर्चाच होत्या. पण अशा प्रकारच्या चर्चा बंद करायच्या असतील तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिक बळकट करावी लागेल, असे मत माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की साहित्य संमेलनाचे पावित्र्य राखले जावे. समाजात उभारी आणायची असेल तर सकारात्मक विचार करायला हवा. नकारात्मक प्रसिद्धीच्या बळावर समाज घडायला नको. मराठी साहित्य संमेलनाने भौगोलिक सीमा पार केल्या आहेत. आता मराठी साहित्यानेही या सीमा ओलांडायला हव्यात. मराठी साहित्य खऱ्या अर्थाने वैश्विक व्हायला हवे.आपल्या साहित्यात तेवढी क्षमता आहे. मराठी साहित्याचा ठरा देश-विदेशात उमटायला हवा. वर्षभरात राज्यभर अनेक साहित्य संमेलन घेतले जातात. आता ट्विटरवरही एका साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या माध्यमातून तरुण पिढीलाही साहित्याशी जोडले जात आहे.

यावेळी संबोधित करताना ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार गुलजार म्हणाले, की पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक भाषेसाठी एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित आहे. साहित्यरसिकांचे मी मनापासून कौतुक करतो. आपण विदेशी साहित्य सहज वाचतो. पण आपल्या देशातील पुस्तके वाचायची राहुन जातात. आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांमध्ये भरीव लिखाण करण्यात आले आहे. मराठी त्यापैकी एक भाषा आहे. इतर भाषांमधील साहित्य मराठीत भाषांतरीत व्हावे.
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झाले आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार गुलजार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात स्मरणीकेचे प्रकाशन केले जाते. पण यंदाच्या संमेलनात ‘मराठी भाषा संचित आणि नवदिशा’स्मरणग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शरद पवार यांच्यावरील ‘लोकनायक शरद पवार’ या पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना 88 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाध्यक्षाची सुत्रे प्रदान केली. स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी पाटील यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, केदारनाथसिंह आणि सीताकांत महापात्रा यांच्यासह लेखक प्रा. के. रं. शिरवाडकर आणि प्रकाशक येशू पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
  • बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धा घेतली. १३० जणांनी भाग घेतला. मुंबईच्या पद्मी इराणी आणि इरावती मालेगावकर या दोन मुलींनी कल्पकतेने तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड झाली. त्यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या बोधचिन्हाचे लोभस असे ॲनिमेशनही तयार केले आहे. हा कार्यक्रम राजभवनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच कार्यक्रम राजभवनावर झाला.
  • संकेतस्थळाचे उद्‌घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पिंपरीत झाले. रेडिओ जिंगलही तायार झाली. संमेलनाचे मोबाईल ॲप अमोल कोल्हे यांच्या हस्ते, विशेष टपाल तिकीट अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते प्रकाशित झाले.