नागरिकांना चांगली आरोग्य सेवा द्या – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत

0
9

नंदुरबार, दि. 21: जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध रहावे. असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिले.

जिल्ह्यातील आरोग्य विषयक कामकाजासंदर्भात सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक हिरा एक्झीक्युटीव्ह येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, खासदार डॉ. हिनाताई गावीत, जिप चे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला बाल कल्याण समिती सभापती संगीता गावीत, विषय समिती सभापती गणेश पराडके, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावीत म्हणाले की, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी. दुर्गम भागात काम करतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियमित उपस्थित राहावे. जेणेकरुन दुर्गम भागात आरोग्याचे प्रश्न उद्भवणार नाही. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. वैद्यकीय अधिकारी रजेवर जातांना पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. रजेवर जाण्यापूर्वी रजेचा अर्ज वेळेवर कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा. हजेरीची नोंद करण्यासाठी कोबो केअर ॲपचा वापर करावा. प्रत्येक कुटूबांचे सर्व्हेक्षणकरुन त्यांचा आरोग्य डाटा तयार करावा असेही त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. गावीत म्हणाल्या की, शासनाकडून आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी औषधे, साधन सामुग्री, विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून आरोग्याच्या रॅकींगमध्ये नंदुरबार जिल्हा प्रथम पाच जिल्ह्यामध्ये येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना हार्ड शिफ अलाऊन्स भत्ता मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. जिल्ह्यात नवीन ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रस्ताव सादर करावा. ग्रामीणस्तरावर आरोग्य विषयक शिबीराचे आयोजन करावे असे त्यांनी सांगितले.

यावेळी सन 2017-2018 वर्षांतील कायाकल्प पुरस्कार प्राप्त प्राथमिक आरोग्य  केंद्र, खापर तसेच सन 2019-2020 वर्षांतील कायाकल्प पुरस्कार प्राप्त प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान शहादा येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व सद्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समुदाय वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेवून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे निर्देश प्रशासनास दिलेत.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी यांनी केले. बैठकीस सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मानसेवी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.