संचारक्रांतीच्या सहाय्याने मराठी जगभर पोहोचविण्यास राज्य सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री

0
19

मुंबई दि..२७:: संचार क्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध साधने आपल्याला लाभली आहेत. याचा उपयोग करून मराठी जगभरात पोहोचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ साहित्यिक व कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमीत्त विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर सभागृहात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठी गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना स्व.शाहीर साबळे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ.विजया वाड यांना कविवर्य स्व. मंगेश पाडगावकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कार्यक्रमाचे आयोजक आमदार आशिष शेलार, पराग अळवणी, मनीषा चौधरी, उपमहापौर अलका केळकर, देवदत्त साबळे, अंजली पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मराठीच्या संवर्धनासाठी सर्वतोरी पुढाकार घेतला जाईल. राज्य सरकार युनिकोड कन्सॉर्टियम या संघटनेचे सदस्यत्व प्राप्त करून मराठीला संगणकाद्वारे जगभर पोहोचविणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज 21व्या शतकाने जी मूल्ये तयार करून दिली, त्यामुळे संचारक्रांती झाली आहे. या संचार क्रांतीमुळे अभिव्यक्तीची विविध दालने खुली केली आहेत. या दालनांचा वापर करून जोपर्यंत मराठी तरूणांच्या मनामध्ये शिरकाव करत नाही तोपर्यंत मराठीच्या विस्ताराची अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.तावडे म्हणाले, मराठीच्या संवर्धनासाठी व भविष्यातील प्रगतीसाठी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना मंगेश पाडगावकर आणि डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री.शेलार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.