एटापल्ली दौरा मुख्यमंत्र्यांचा खाण आढावा-भूमकाल संघटना

0
14

गडचिरोली, दि..२७: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्ली तालुक्यातील बुर्गी या गावी केलेला दौरा हा “खाण” आढावा दौरा असून, या दौऱ्याचा आदिवासींच्या विकासाशी काहीही संबंध नाही, अशी टीका भूमकाल संघटनेचे सचिव प्रा.अरविंद सोवनी यांनी केली आहे.

प्रा.अरविंद सोवनी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, २५ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एटापल्ली तालुक्यातील बुर्गी-येमली या लहानशा गावाचा दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गावात पोहोचले ते शाळा, आरोग्यकेंद्र, पूल, अथवा बँकेच्या नव्हे, तर पोलिस ठाण्याच्या उद्घाटनाला. मात्र या गावात रस्ता नाही, आरोग्य केंद्र नाही, कर्मचारी सेवा देत नाहीत. अशी या आणि आसपासच्या अनेक गावांची व्यथा आहे. त्यामुळे आदिवासी बोलत जरी नसले, तरी मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीतील विरोधाभास सर्वांनाच समजला आहे.

एटापल्ली तालुक्यातील आरोग्यसेवा किती तकलादू आहे, हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण राज्याला दिसले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी या भागात एखादे विशेष रुग्णालय मंजूर करून त्याच्या उद्घाटनाला ते स्वतः आले असते, तर ती निश्चितच कौतुकाची बाब होती. मात्र “नक्षलग्रस्त भागाचा विकास” या गोंडस नावाखाली सुरजागड भागात खाजगी कंपन्यांमार्फत लोह-खनिज उत्खननाचे शासनाचे नियोजन असून, जनतेला संरक्षण देण्यापेक्षा खानिज आणि खाजगी कंपन्यांना संरक्षण देण्याचा शासनाचा हेतू आता उघड झाला आहे, अशी जोरदार टीका प्रा.अरविंद सोवनी यांनी केली आहे.