बचत गटाच्या वस्तुला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार

0
14

चंद्रपूर दि..२७: महिलांमध्ये प्रचंड कल्पकता आहे, त्यामुळेच बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तुंची निर्मिती महिला करतांना दिसत आहेत. महिलांच्या या वस्तुंना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे महिला स्वयंसहायता गटाच्यावतीने उत्पादित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, पंचायत समिती सदस्य अविनाश पाल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात बचत गटाद्वारे उत्पादित वस्तुंचा चांगला मॉल उभा राहावा अशी आपली ईच्छा आहे. त्यासाठी चांगली जागा उपलब्ध झाल्यास उत्तम दर्जाचा मॉल उभारु. या ठिकाणी बचत गटांना स्वस्त दरात जागा उपलब्ध करुन देवू, यासाठी येत्या सहा महिन्याचा भूमिपूजनाचा मुहूर्त समोर ठेवून काम करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांचीही भाषणे झाली. बचत गटाच्या महिलांनी गटाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी साधावी, असे या मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी बचत गटांना राजमाता जिजाऊ पुरस्काराचे तसेच काही बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. सुरुवातीस मार्गदर्शिकेचे विमोचनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हाभरातील महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दि.2 मार्च 2016 पर्यंत चालणाऱ्या या हिराई महोत्सवात बचत गटाद्वारेनिर्मित विविध वस्तुंचे स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.