जागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला ‘चला खेळू या’ उपक्रमाचे आयोजन

0
6

मुंबई, दि. १८ : राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला खेळूया’ उपक्रमाचे आयोजन २० व २१ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे.

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशिबेन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असून, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनही होणार आहे. या वर्षाची थीम ‘खेळण्याचा अधिकार’ ही असून प्रमुख पाहुणे असलेली भारतीय संघाची माजी बास्केटबॉल कर्णधार दिव्या सिंग मुलांबरोबर खेळामध्ये सहभागी होणार आहे. दोन दिवसीय या उत्सवात तीन हजारहून अधिक मुलांसाठी कार्यशाळा, खेळ, नृत्य, मल्लखांब, कथाकथन आणि जादूचे प्रयोग होणार आहेत.

२० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता फुटबॉल, टेनिस, क्रिकेट आणि अॅथलेटिक्स या स्पर्धांमध्ये ३०० मुले सहभागी होणार आहेत. इतर मुलांसाठी टाय आणि डाई, फिंगर पपेट मेकिंग, फेस मास्क मेकिंग, पॉटरी, पंच क्राफ्ट, टॅटू आर्ट, स्टोरीटेलिंग, हॅन्ड पेंटिंग आणि साहसी खेळ यांसारख्या विविध कार्यशाळांचा आनंद घेता येईल. मुले दिवसभर चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. तसेच बालहक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.

सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासह आणि एनएमआयएमएस मोंटाज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या संगीत बँडसह कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

‘जागतिक बाल दिन’ हा २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्कावरील ‘कन्व्हेन्शन ऑफ द चाइल्ड राइट्स’ (CRC) संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. लिंग, वंश, धर्म, अपंगत्व, लैंगिकता किंवा इतर भेदभावांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंद मिळायला हवा यासाठी त्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाते.