महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्याची कार्यवाही करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

0
25

मुंबईदि. 7:  रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य  सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे 200 खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात महाड येथे रुग्णालय उभारण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री डॉ. सावंत आढावा घेताना बोलत होते. बैठकीस आमदार प्रविण दरेकर, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर,  सहसचिव अशोक आत्राम, सहसंचालक विजय कंदेवाड, विजय बावीस्कर आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील परसुळे (ता. पोलादपूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात निधीची उपलब्धता आणि कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  बैठकीत आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी दिल्या. तसेच 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम, आपला दवाखाना रूग्णसंख्या व सद्यस्थिती, खरेदी प्राधिकरण, धर्मादाय रूग्णालय ॲप, आरोग्य विभागाचे नवीन मंडळ कार्यालय स्थापन करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.