जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठीचा ७४५ कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

0
2
वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोलापूर, दि. 8:- जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजनेसाठी साठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 151 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनासाठी 4.28 कोटी असे एकूण 745.28 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावेत व हा निधी प्राधान्यक्रम ठरवून शंभर टक्के खर्च करण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करावे, असे निर्देश महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री जय सिद्धेश्वर स्वामी, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले – तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे व अन्य व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, मागील वर्षी ज्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीने मंजूर असलेला निधी 682 कोटीचा निधी शंभर टक्के खर्च केलेला आहे. ही बाब अत्यंत समाधानाची असून याबद्दल जिल्हाधिकारी व सर्व विभाग प्रमुखाचे त्यांनी अभिनंदन करून  यावर्षीचाही मंजूर असलेला 745.28 कोटीचा निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना केल्या. प्रत्येक शासकीय यंत्रणेला मंजूर असलेल्या निधी बाबत संबंधित लोकप्रतिनिधीच्या ही सूचना घ्याव्यात. त्याप्रमाणे सूक्ष्मपणे नियोजन करून नियोजन समितीला प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती उपायोजना व आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजना सन 2022 23 करता माहे मार्च 2023 अखेरच्या अंतिम खर्चास नियोजन समितीची मान्यता असल्याचे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगून या सभेमध्ये लोकप्रतिनिधी व सदस्याकडून होणाऱ्या चर्चा, मागणी, प्रश्न, प्रस्ताव याबाबत इतिवृत्त मध्ये सविस्तर माहिती देण्यात यावी व त्याबाबतचे अनुपालन संबंधित लोकप्रतिनिधींना कळवावे असेही त्यांनी सूचित केले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जलजीवन कामाबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष घालून ती कामे गुणात्मक व दर्जात्मक करून घ्यावीत व या योजनेपासून वगळलेल्या गावांचा त्यात समावेश करावा, वीज वितरण कंपनीने अखंडित वीज पुरवठा करावा विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर ते तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी तसेच टंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने अत्यंत दक्ष राहून पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व चाऱ्याचा प्रश्न सोडवण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मध्ये मंजूर असलेली 628.28 कोटीची तरतूद 99.85% खर्च करण्यात आल्याची माहिती देऊन यावर्षीचा 745 कोटीचा निधी अर्थसंकल्पीत असून सर्व संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरित सादर करावेत याबाबत कळविण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना सन 2023 24 सर्वसाधारण योजनेसाठी 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनासाठी 151 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेर उपाय योजनेसाठी 4 कोटी 28 लाखा चा निधी मंजूर असून नियोजन समितीला 222 कोटी 92 लाख रुपये प्राप्त झाले असून त्यातील 33 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आमदार सर्वश्री बबनदादा शिंदे, शहाजी पाटील, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजयमामा शिंदे, यशवंत माने, सचिन कल्याण शेट्टी, प्रणिती शिंदे, राम सातपुते, राजेंद्र राऊत यांच्या सह जिल्हा नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

लम्पी आजाराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी  प्रभावीपणे करावी, असे निर्देश पशुसंवर्धन तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार बाधित किंवा लसीकरण केलेल्या पशुधनाच्या वासरांनाही लसीकरण करावे. जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे  मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. यासाठी वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अशा सूचना दिल्या.

जिल्ह्यात सात लाख 45 हजार 324 गोवंशीय पशुधन आहे.सध्या जिल्ह्यात दिनांक 1 एप्रिल ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 581 जनावरांचा मृत्यू झाला असून, 6 हजार 879 पशुधन बाधित होते. यामध्ये उपचाराने 5 हजार 328 जनावरे बरे झाली आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 55 पशुधन बाधित होत आहे. जिल्ह्यात जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून,  आतापर्यंत सात लाख 56 हजार 800 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए.सी बोरकर यांनी दिली.