नाशिक, दिनांक: 9 : कायदा व सुव्यवस्थेला बाधा न येता सर्वांच्या समन्वयातून व सहकार्याने आगामी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करुया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नाशिक जिल्ह्याला सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. हा नावलौकीक कायम राखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुन या उत्सावाच्या माध्यमातून सामाजिक विचारमंथन आणि राष्ट्रप्रेम जागृतीसाठी प्रयत्नशील राहूया. गणेशोत्सव मंडळांना कुठलीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या अडचणीचे तातडीने निवारण होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात पोलीस, महापालिका व वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांचे एक पथक नेमण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्यात.
त्याचबरोबर गणेशोत्सावाच्या काळात शहरात स्वच्छता राखली जाईल, तसेच वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. गणेश विसर्जन मार्गावरील खड्डेबुजविणे, या मार्गावरील अतिक्रमण काढणे, मिरवणुकीस अडथळा येणाऱ्या विद्युत तारा हटविणे, नागरीकांसाठी रस्ते मोकळे राहतील याबाबत दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
सर्वोत्कृष्ट गणेश मंडळासाठी राज्य शासनाने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 6 लाख रुपये उपलब्ध करुन देऊन जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केली. तसेच नागरीकांना विविध गणेश मंडळांनी केलेली आरास बघता यावी याकरीता शेवटचे चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत आरास खुली ठेवण्यास परवानगी देण्याबाबत तसेच गणेश मंडळांना जाहिरात शुल्क न आकरण्याबाबत प्रशासनाने निर्णय
घेण्याबाबत सुचित केले. त्याचबरोबर मुस्लीम बांधवांनी ईद ए मिलाद ची मिरवणुक दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक करुन आभारही मानले. या बैठकीत विविध मंडळांनी ज्या समस्या मांडल्या त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिले.
गणेश मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानगी तातडीने देण्याच्या नियोजन सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच गणेश मंडळांना कोणत्याही अडचणी येवू नये याकरीता जिल्हा प्रशासन सर्व उपाययोजना राबवित असून गणेश मंडळांनीही नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर राज्य
शासनाने गणेश मंडळांसाठी आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा त्याचबरोबर शासनाच्या लोाकोपयोगी योजनांवर आधारित देखावे, आरास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून गणेश मंडळांना चांगल्या सुविधा दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटये यांनी प्रशासनाचे आभार माणून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, रामसिंग बावरी, सत्यम खंडाळे, गणेश बर्वे आदिंसह विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलीक सुचना मांडल्या.
मनपा, वीज वितरण कंपनी, पोलीस विभागामार्फत गणेशोत्सवासाठी केलेल्या नियोजनाची व उपयोजनांची माहिती बैठकीत दिली. बैठकीचे सुत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले.