मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे शेतकऱ्यांनो, महाडीबीटीवर अर्ज करा

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

कृषी विभागाचे आवाहन

जिल्हयाला 255 शेततळयांचे उद्दिष्ट

वाशिम, दि. 15  मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करून शेततळ्याच्या अनुदानाच्या रक्कमेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेततळे या घटकाची महाडीबीटी प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्षांक देऊन ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर योजनेंतर्गत देय असलेले अनुदान संबंधीत शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र जमीन असावी व जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे, सामुहीक शेततळे किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळयासाठी शासनाचे अनुदानाचा लाभ घेतलेले नसावे. महाडीबीटी पोर्टलवर विकसीत केलेल्या संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभार्थ्याला लाभ देण्यात येईल. शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष ज्या जमीनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात यावी. जलपरिपूर्ण झालेल्या पाणलोट क्षेत्रात, टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात घेण्यात यावी. मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमिन असलेली जागा नाल्याच्या/ ओहोळाच्या प्रवाहात सभोवतालच्या जमिनीत दलदल व चिबड होईल तसेच शेततळ्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्याच्या स्थावर/जंगम मालमत्तेचे नुकसान होईल, अशा जमिनीची जागा शेततळ्यासाठी निवडण्यात येवू नये. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे.

शेततळ्यासाठी आकारमाननिहाय देण्यात येणारे अनुदान – या योजनेत 15X15X3, 20X15X3, 25X20X3, 25X25X3, 30X3X3 आणि 34X34X3 मीटर आकारमानाचे यंत्राद्वारे इनलेट/आऊटलेट, खोदाई व सिल्ट ट्रॅपसह व विरहीत शेततळ्यांकरीता १४,४३३ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. वैयक्तिक शेततळ्यासाठी विविध आठ प्रकारचे आकारमान दर्शविण्यात आले असते तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार अनुदान देण्यात येईल. मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतकऱ्यांने स्वतः करावयाचा आहे.
जिल्ह्यास एकुण २५५ शेततळ्याचे उद्दिष्ट असून तालुकानिहाय ते निश्चित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahit.gov.in/Farmer/Login या संकेतस्थळावर अर्ज करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शहा यांनी केले