मुंबई दि 18 – राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस केली आहे, अशा जातींच्या कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल राष्ट्रीय आयोगाकडे सादर करावा. तसेच, नव्याने आलेल्या अर्जासंदर्भातील शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून शिफारस तातडीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिल्या.
आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राष्ट्रीय सूचित समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींचे अर्ज प्रलंबित आहेत, त्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
श्री. अहिर म्हणाले की, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, भोयर पवार, सुर्यवंशी गुर्जर, बेलदर, झाडे, डांगरी व कलवार, शेगर-धनगर या जातींचा राज्य मागास यादीत समावेशाबाबत कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे १५ दिवसांत यादी पाठविण्यात यावी. तसेव, नव्याने आलेल्या शिफारशींवर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या परिस्थिती आणि अडचणी तपासाव्यात. ही कार्यवाही जलदगतीने करण्यासंदर्भात त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल, सचिव राजीव रंजन, सल्लागार राजेश कुमार, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, ॲङ बी.एल. सगर किल्लीकर, सदस्य सचिव श्रीमती आशाराणी पाटील, आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशिष देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.