शालेय पोषण आहाराची अफरातफर! वाडीत सापडली मिरची पावडरची पाकिटे

0
16

देवरी- तालुक्यातील ग्रामपंचायत पालांदूर/जमी. येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ येथे शालेय पोषण आहाराची अफरातफर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीच्या शेजारील वाडीत शालेय पोषण आहारातील मिरची पावडरची सुमारे आठ ते दहा किलो वजनाची पाकिटे आढळून आली आहेत. अंगणवाडी सेविकेने हे साहित्य वाडीत लपवले असावे, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. या अंगणवाडी केंद्रात शोभा लांजेवार या सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्या शासनाकडून आहार मिळत असतानाही विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.१४ आक्टोबर रोजी अंगणवाडीच्या शेजारी असलेल्या वाडीत मिरची पावडरची पाकिटे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी लांजेवार यांना विचारपूस केली. यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला. याबाबत सरपंच आणि उपसरपंचांसह ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत अंगणवाडी सेविकेला जाब विचारला. मात्र, लांजेवार यांनी त्यांनाही योग्य उत्तरे दिली नाही. अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हे साहित्य जप्त केले.  दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी सेविका शोभा लांजेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पुढील दोन दिवसांत निर्णय न झाल्यास अंगणवाडीला कुलूप ठोकण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.