भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांची महसूल आढावा बैठक

0
8

मुंबई दि. 17 : महसूल विभागाने निश्चित करून दिलेल्या महसूलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील महसुली कामांचा आढावा श्री. विखे पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील महसुली कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह संबधित उपसचिव, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार संबंधित जिल्ह्यात वाळू डेपोची निर्मिती करावी आणि सामान्य जनतेला शासन दरानुसार वाळू उपलब्ध करून द्यावी. तसेच संबंधित जिल्ह्यांना देण्यात आलेल्या महसूलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे. अवैध उत्खनना बाबतीत तक्रारी दूर करण्यासाठी यंत्रणानी मिशन मोडवर काम करावे. शासनाचे नुकसान होणार नाही यांची काळजी घ्यावी. वाळू डेपो, गौण खनिज याबाबत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिले.