रुग्ण सेवांप्रती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सजगता बाळगावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

0
1

सांगलीदि.24 : सामान्य माणसाला आरोग्य सेवेसाठी शासकीय रुग्णालये आधार वाटतात. यासाठी शासनाने शासकीय रुग्णालये व महाविद्यालयांमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि यंत्र सामग्री उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. शासकीय रुग्णालये व तेथील रुग्ण सेवांप्रती डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी यांनी सजग राहून गरजू सर्वसामान्यांची आरोग्य सेवा करावी. यासाठी रुग्णालयास आणखी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देवून केलेल्या पाहणीनंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज हे वैद्यकीय सेवा व उपचारांचे हब आहे. या ठिकाणी चांगल्या आरोग्य सेवा मिळतात, असा नावलौकिक आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास आपुलकीची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासकीय रुग्णालयातील प्रत्येक घटकाने योगदान देणे आवश्यक आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सांगली येथील ५०० खाटांच्या रूग्णालयास निधी व मिरजेतील २५० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लवकरच मान्यता देण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुग्णालयासाठी सर्जिकल साहित्य, औषधे खरेदी, विविध सेवा व यंत्र सामग्री उपलब्ध करुन दिल्याबद्दल  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांचे अभिनंदन केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याबरोबरच या ठिकाणी अत्यावश्यक यंत्रसाम्रगी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. रुग्णालयात लागणारी ४० टक्के औषधे खरेदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना देण्यात आले आहेत. तर जिल्हा नियोजनमधून घेण्यात येणारी औषधेही खरेदी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले असल्याचे सांगून, रुग्णालयात अपुरे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करुन देवून सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह, नर्सिंग अध्यापक व कर्मचारी निवास आणि नर्सिंग महाविद्यालय कार्यालयीन खर्चासाठी पाठविण्यात आलेल्या 47.25 कोटी रुपयांच्या प्रस्तावास विभागाने तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बैठकीत केली असता या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय  मिरज मधील आरोग्य सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा याबाबत मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील अद्ययावत करण्यात आलेल्या ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याहस्ते व पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

बैठकीपूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी मिरज शासकीय रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा, वॉर रुम, स्त्री रोग, प्रसुतिशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभाग, आय.सी.यु, डायलेसिस विभागांना भेट दिली. तसेच, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या स्किल लॅबची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री डॉ. खाडे उपस्थित होते.