ठाणे, दि. १३ : ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.
राज्य सरकारच्या निधीतून ठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे ‘वॉटर स्क्रीन’सह असून प्रेक्षकांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिर असे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर करण्यात आले.
याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, जयश्री डेव्हिड, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहे, रस्ते चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचे आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायला, फिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार सरनाईक यांना असे कारंजे ठाण्यात करण्याबद्दल बोललो होतो. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवले, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, येथील शो विनामूल्य ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
मुख्यमंत्र्यांमुळे ठाण्यात विविध प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. असे आणखी दोन संगीतमय कारंजे लवकरच सुरू होतील, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. या कार्यक्रमात चित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल तसेच, संदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.