महायुतीचा संकल्प मेळावा 14 रोजी- पत्र परिषदेत घटक पक्षाची माहिती

0
13

गोंदिया: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभरात 14 जानेवारी रोजी मेळावे घेण्यात येत आहेत. या अंतर्गत गोंदिया येथील ग्रीनलँड लॉन येथे 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता महायुतीतील सर्वच घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यातून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प घेण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित घटक पक्षातील पदाधिकार्‍यांनी स्थानिक शासकीय विश्राम गृहात 12 जानेवारी रोजी आयोजित पत्र परिषदेत दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येसुलाल उपराडे, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव गंगाधर परशुरामकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी विजय शिवणकर, जिप सभापती संजय टेंभरे, चाबी संघटनेचे रोहित अग्रवाल आदी उपस्थित होते.
पुढे माहिती देताना अ‍ॅड. उपराडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे विकासात्मक कार्य जोमात सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वात राज्यात महायुती सरकार लोक कल्याणकारी व सर्वांगीण विकास साधणारे कार्य करीत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना व विकास कार्य जनमानसात पोहचविले जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून लढली जाणार आहे. यात राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प महायुतीने घेतला आहे. दरम्यान भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प घेण्यासाठी व घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला भाजप जिल्हा महामंत्री सुनील केलनका, नानू मुदलीयार, भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, शहर अध्यक्ष अमित झा, जयंत शुक्ला, किशोर तरोणे आदी उपस्थित होते.