संदीप पाटील नक्षल विरोधी अभियानाचे ‘विशेष पोलीस महानिरिक्षक’

0
60

गोंदिया,दि.01- गडचिरोली-गोंदियाचे  डीआयजी असताना संदीप पाटील यांचे कार्यालय नागपुरात होते. पदोन्नतीनंतर ते नागपुरातल्या नागपुरात एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बसणार आहेत. हे कार्यालय बदलताना त्यांच्या कामाचे स्वरूप मात्र आता व्यापक होणार आहे. गडचिरोली-गोंदियासह आता राज्यभरातील नक्षलवादी पाळेमुळे उखडून फेकण्याची महत्त्वाची जबाबदारी पाटील यांच्यावर असेल. विशेषत: छुपा शहरी नक्षलवाद हुडकून काढण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नक्षल विरोधी अभियानाच्या विशेष पोलीस महानिरिक्षकाची(आयजी) पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर होती. आता पाटील ही जबाबदारी पेलणार आहेत.

‘प्रसिध्दी’मध्ये न राहता आपले कर्तव्य चोखपणे बजावणारे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस संदीप पाटील यांना त्यांच्या कर्तबगारीचे बक्षीस मिळाले आहे. एकेकाळी गडचिरोलीमध्ये शेकडो नक्षल एन्काऊंटर करणारे पाटील आता नक्षल विरोधी अभियानाचे राज्याचे विशेष पोलीस महानिरिक्षक ‘आयजी’ झाले आहेत.

गडचिरोली पोलिस अधीक्षक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांची पुणे येथे बदली झाली होती. कोविड काळात पाटील यांनी पुण्यात केलेल्या कामाची स्तुती राज्यभर झाली. पुण्यातून त्यांची पदोन्नतीवर उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून गडचिरोली परिक्षेत्रात बदली झाली. पुण्यासारख्या शहरातून पुन्हा विदर्भात मिळालेली ‘पोस्टिंग’ पाटील यांनी स्वीकारत नक्षलवादी चळवळीचा बिमोड केला.

आयपीएस संदीप पाटील डीआयजी असतानाच मर्दीनटोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवादी चळवळीचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला. याच चकमकीत तब्बल 26 नक्षवादी ठार झाले होते. महाराष्ट्रापासून केंद्रापर्यंत सर्वांनीच या कामगिरीचे कौतुक केले. जणू एखाद्या क्षेत्रात एखादा व्यक्ती पूर्णत: ‘मास्टरी’ मिळवितो अगदी त्याच पद्धतीने संदीप पाटील यांनी नक्षलवाद विरोधी मोहिमेवर आपली ‘कमांड’ मिळविली आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना याच विभागाच्या डीआयजी पदावरून आयजी अशी पदोन्नती देण्यात आली असावी असे सांगण्यात येत आहे.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक असताना पाटील यांनी या नक्षलवाद प्रभावित जिल्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. सीमावर्ती भागात चालणाऱ्या कारवायांवर त्यांनी अंकुश लावला. त्यांचा हाच अनुभव ते डीआयजी झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या कामी आला. अनेक चकमकींमध्ये गडचिरोली पोलिसांना जे यश आले, त्यामागे संदीप पाटील हे नाव घेतलेच जाते. गडचिरोली पोलिसांसोबतच पाटील यांचे स्वतंत्र असे ‘इन्फर्मेशन नेटवर्क’ आजही कार्यरत असल्याचे सांगितले जाते. आपल्या या अनुभवाचा फायदा ते महाराष्ट्र पोलिस दलाला करून देत आहेत.