जलयुक्त शिवार अभियान २.०; जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिवपद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे

0
4

मुंबई, दि. 7 : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तर तालुकास्तरीय सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० च्या प्रकल्प व्यवस्थापक तथा सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा, सनियंत्रण व कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी (प्रांत) च्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग हे आहेत. तालुकास्तरीय समितीचे सदस्य सचिव उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे होत. आता जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय समितीचे सदस्य सचिव बदलून जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव पद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे व तालुकास्तरीय समितीचे सदस्य सचिव पद तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा पाणलोट कक्ष व माहिती केंद्र (WCDC) या समितीची फेररचना करण्यात आली आहे.त्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 च्या प्रकल्प व्यवस्थापक तथा सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभागाने निर्गमित केला आहे.