काँग्रेस, राष्ट्रवादी वाचताहेत आपल्याच पापाचे धडे, रावते यांचा टोला

0
11

नागपूर – दुष्काळाच्या चर्चेवरून विधान परिषदेत बुधवारी सत्ताधारी व विरोधकांची चांगलीच जुंपली. सरकार संवेदनशील नाही. महसूल मंत्री एकनाथ खडसे सभागृहात हजर नाहीत, यावरून विरोधकांनी गोंधळ केला. मात्र खडसेंची उणीव जाणवू न देता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

‘दुष्काळावरून आता आरडओरडा करण्यापेक्षा गेल्या १५ वर्षांत सिंचनाचे काम केले असते तर राज्यावर ही वेळ आली नसती. तुम्हीच आपल्या पापाचे धडे वाचत आहात’, असा टोला लगावला.
दुष्काळावरून सुरूवातीला सभागृह बंद पाडणा-या विरोधकांनी अखेर चर्चा करण्याचे मान्य केल्यानंतर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी चर्चेला सुरूवात केली. कोरडवाहू शेतक-यांसाठी हेक्टरी २५ हजार, तर बागायतींकरीता ५० हजारांची मदत करावी, अशी सूचना केली. धनंजय मुंडे दुष्काळावर बोलत असताना खडसे सभागृहाबाहेर गेले. ही संधी साधून विरोधकांनी गोंधळ केला. सुनील तटकरे, भाई जगताप यांनी ‘सरकारला गांभीर्य नाही’ असे सुनावले. मंत्री नसतील तर सचिव तरी टिपणे घेण्यासाठी उपस्थित असायल हवेत, असे तटकरे म्हणाले. त्याला दिवाकर रावते, चंद्रकांत पाटील, यांनी हरकत घेतली.