नाशिक जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

0
1

नाशिक, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृतीसाठी पुरेसा अवधी असून, त्यासाठी स्वीप (SVEEP) उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात स्वीप (SVEEP) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या मुख्य नोडल अधिकारी आशिमा मित्तल, महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह स्वीप संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याविषयी सूचना देतांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा सर्वोच्च हक्क बजावला पाहिजे. त्यासाठी मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी स्वीपच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात यावे. जेणे करून मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

विधानसभा मतदार संघनिहाय घेण्यात येणाऱ्या स्वीप उपक्रमांचा आढावा घेताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे दस्तावेजकरण (डॉक्युमेंटेशन) करण्यात यावे. तसेच 8 एप्रिल 2024 रोजी मतदान जनजागृतीपर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे सर्व SVEEP संबंधित नोडल अधिकारी यांनी जनजागृती उपक्रमास प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे त्यांनी सूचित केले.

आशिमा मित्तल म्हणाल्या, शहरी भागातील मुख्य ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात येवून ‘व्होट कर नाशिककर’ आणि ‘मी ठरवणार माझा खासदार’ या टॅगलाईनचा वापर करण्यात यावा. तसेच या महिन्यात येणारे गुढीपाडवा, रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा मोठ्या कार्यक्रमांच्या वेळी मतदान जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात यावेत. यासोबतच सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर हॉटेल्स व रेस्टॉरंट चालकांची बैठक घेवून त्यांच्या माध्यमातून मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी 20 व 21 मे या दोन दिवसांत काही विशेष सवलत देण्याबाबत चर्चा करावी. त्याचप्रमाणे त्यांच्या बँका, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिकांशी समन्वय साधून मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात पोस्टर, बॅनर्स, तसेच टेबल कार्ड यांचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात यावे. राजकीय वगळता विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती जसे सेलिब्रेटी, क्रीडापटू, महाविद्यालयात प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांच्या सहभागातून जास्तीत जास्त मतदानाची जनजागृती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून नियोजन करण्याच्या सूचना ही आशिमा मित्तल यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय राबविण्यात आलेल्या स्वीप उपक्रमांची सादरीकरणाद्वारे माहिती बैठकीत सादर केली