डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताचे संविधान आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

0
4

मुंबई, दि. ०३ एप्रिलः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे १९२३ ला सादर केलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपीः इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन’ या डी.एस्सी प्रबंधाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आणि महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या स्मरणार्थ मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (स्वायत्त), मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर इन पॉलिटिकल इकॉनॉमी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर अफर्मेटिव्ह ॲक्शन (ICCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारताचे संविधान आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान या विषयावर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मुंबई येथे एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. एकूण चार सत्रात पार पडलेल्या या परिषदेसाठी एनएसईचे एमडी आणि सीईओ डॉ. आशिष चौहान, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे येथील कुलगुरू डॉ. अजित रानडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, आयसीसीएएचे अध्यक्ष सुनील झोडे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आणि मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या संचालिका प्रा. मनिषा कर्णे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सत्राची सुरुवात आयसीसीएएचे अध्यक्ष सुनील झोडे यांनी स्वागत पर भाषण केले. तर परिषदेच्या निमंत्रक मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या संचालक डॉ. मनीषा कर्णे यांनी परिषदेचा उद्देश्य आणि रूपरेषा यावर आपले विचार मांडले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योगदान आणि भारतीय संविधानात प्रतिबिंबित झालेल्या सर्वसमावेशकतेचा चिरस्थायी वारसा अधोरेखित केला. डॉ. अजित रानडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर प्रकाश टाकला, विशेषत: विनिमय दरांचे व्यवस्थापन करण्याबाबत ते आजही कसे समर्पक आहेत हे त्यांनी विशद केले. तरुण पिढीला सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करत राष्ट्राचे भविष्य घडवण्यात तरूणांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी जोर दिला. डॉ. अजित रानडे यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार कालातीत असून समकालीन आर्थिक प्रवचनातील त्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

डॉ. आशिष चौहान, एनएसईचे एमडी आणि सीईओ,यांनी संविधानात अंतर्भूत असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूलभूत तत्त्वांवर डॉ. आंबेडकरांनी भर दिला आणि त्या अनुरूप सविधनात्मक तरतुदी सुद्धा समविष्ट केल्या. भारताच्या प्रगतीला दिशा देणारी आणि तेथील नागरिकांसाठी आशा निर्माण करणारी एक भक्कम चौकट म्हणून त्यांनी संविधानाचे कौतुक केले. समापन सत्रात डॉ. नरेंद्र जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रज्ञ, प्रशासक आणि शिक्षणतज्ञ म्हणून बहुआयामी योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक आव्हानांवर व्यावहारिक उपायांवर आणि भारताच्या विकासाच्या मार्गाला आकार देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर भर दिला.

दिवसभर चाललेल्या परिषदेत विविध क्षेत्रातील विद्वानांनी लिंगभाव, जात, शिक्षण, पाण्याचे हक्क आणि त्यामधील भेदभाव, कामगारांचे अधिकार, सामाजिक न्यायाची संकल्पना आणि उपेक्षित समुदायांचा विकास यासह विविध क्षेत्रांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानावर शोधनिबंध आणि विश्लेषणे सादर केली.

एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेने भारताच्या संविधानावर आणि अर्थव्यवस्थेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सखोल प्रभावावर विद्वत्तापूर्ण विचारमंथन आणि चिंतन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आधुनिक भारताचे क्रांतिकारी नेते आणि शिल्पकार म्हणून त्यांच्या स्थितीची पुष्टी केली. या कार्यक्रमाने डॉ. आंबेडकरांच्या वारशाचा गौरव केला आणि भारतातील समकालीन सामाजिक-आर्थिक आव्हाने आणि संधी यांवर अर्थपूर्ण संवादासाठी एक मंचही उपलब्ध करून दिला. या परिषदेला मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, डॉ. श्रीमाळी आणि आयसीसीएए च्या अनेक सदस्यांनी आणि विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी आपले विचार मांडले.