जालना : जो कोणी आमदार सगे-सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा जीआर काढेल त्यांना आम्ही ‘चून-चून के’ पाडू, असा निर्वाणीचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. आंतरवेली येथे सुरु असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. जरांगेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांची लाईन लागते. तर, हाके यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशीही कोणताच नेता दखल घेत नाही. त्यामुळं ओबीसींचा हा वणवा पेटत जाणार आणि संबंध महाराष्ट्रात उपोषण सुरू होईल, असं देखील शेंडगेंनी म्हटलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने लेखी स्वरुपात स्पष्ट करावं. त्याशीवाय हे आंदोलन थांबणार नाही. उलट ओबीसींशी पंगा घेणं कुणालाही परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.