पत्रकार विशाखा निकम यांना लाडली पुरस्कार

0
69

मुबंई,दि.०६–बीबीसी मराठीच्या दिल्लीस्थित पत्रकार विशाखा निकम यांना यावर्षीचा प्रतिष्ठीत लाडली पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशाखा निकम मुळच्या अमरावती जिल्ह्यातील वरुडच्या रहिवासी आहेत. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यात जंगलात शेती करणाऱ्या दोन बहिणींचा संघर्ष त्यांनी ज्या कथेतून मांडला त्या कथेसाठीच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या हस्ते मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात विशाखा निकम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतूत होत आहे. दरम्यान, यापुर्वी त्यांना मागील महिन्यात पुण्यात कॅलिडस मीडिया अकादमीच्या वतीने पत्रकारीतेतील उत्कृष्ठ कार्यासाठी कॅलिडस एक्सेलेंस पुरस्काराने गौरविण्यात आले.

लिंगभेद दूर करण्याच्या हेतूने, तसेच कोणत्याही घटनेकडे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहून केलेले लिखाण, जाहिराती, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम यांसाठी पाॅप्युलेशन फर्स्ट आणि युएनएफपीए या संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात. युएनएफपीए आणि पॉप्युलेशन फर्स्ट संस्थेच्या अंतर्गत मुंबईत १४व्या लाडली माध्यम पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासह पॉप्युलेशन फर्स्टचे विश्वस्त डॉ.ए. एल. शारदा, संचालक योगेश पवार, लाडली मीडिया पुरस्काराच्या समन्वयक डॉली ठाकोर, अनुजा गुलाटी आदी मान्यवर उपस्थित होते. लाडली पुरस्काराच्या १४ व्या आवृत्तीसाठी, देशभरातून ७९८ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये एकुण ७४ पत्रकारांना लैंगिक संवेदनशीलतेसाठी लाडली मीडिया पुरस्कार आणि ३७ पत्रकारांना ज्युरी प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात आले.

‘या’ कथेसाठी निकम यांना लाडली पुरस्कर
सुशीला बिडकर आणि बेबी बिडकर या दोघी बहिणी गेली २३ वर्ष अमरावती जिल्ह्यातील पंढरीच्या जंगलात आपली वडिलोपार्जित शेती करत आहेत. जंगलातील भागात शेती करणे ही अत्यंत अवघड गोष्ट मानली जाते. त्यात जंगली श्वापदांची भीती तर क्षणोक्षणी असते त्यातही दोन बहिणी कुणाच्याही मदतीशिवाय शेती करत आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची गोष्ट विशाखा निकम यांनी मांडली, यासाठी त्यांना लाडली पुरस्कर प्रदान करण्यात आला.

कोण आहेत विशाखा निकम?
विशाखा निकम बीबीसी या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत माध्यम समूहात दिल्लीस्थित पत्रकार आहेत. अमरावतीच्या वरूडमधून त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. बीबीसीपुर्वी त्यांनी एबीपी माझा, टीव्ही९ मराठी, लोकशाही यांसारख्या आघाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांमध्येही काम केले आहे. पत्रकारिता करत असताना आजवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण गोष्टी समाजासमोर मांडल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील बिर बिलिंगमध्ये झालेला पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप, अमरावतीच्या जंगलात दोन बहिणींची शेती आणि त्यांचा संघर्ष, दिव्यांग बांधव तयार असलेली लाखोंची पैठणी, विल्सन आजाराने ग्रस्त अक्षय परांजपे यांची फोटोग्राफी अशा अनेक गोष्टींवर त्यांनी काम केले आहे. आजवर राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांच्या कामाचा लेखाजोखा मुलाखतीतून, रिपोर्ट्समधून मांडला. ग्रामीण आणि शहरी भागातील जीवन, ह्यूमन इंटरेस्ट, महिला विशेष असे विविध विषय त्या उत्तम प्रकारे हाताळतात.
प्रतिक्रिया
पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठित लाडली पुरस्कार मला मिळणं हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे. आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्या जगासमोर मांडणे आणि व्यवस्थेचे लक्ष त्याकडे ओढून घेण्याचे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. पत्रकारितेच्या प्रवासात मार्गदर्शन करणारे सर्व वरिष्ठ, सहकारी, माझे आई वडील यांचे मनापासून आभारी आहे.
विशाखा निकम