आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?

0
74

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना युबीटी (Shivsen UBT) पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळेच, निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, हा निकाला महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित करत ईव्हीएमच्या घोळावरुन संशयही व्यक्त केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा (Election Commision) निकाल अंतिम मानून आता पुढील कामकाज करावे लागणार आहे. त्यानुसार, सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांची बैठक मुंबईत होत असून गटनेता व सभागृह नेत्यांची निवड केली जात आहे. शिवसेना शिंदे गटाने रविवारी सर्वच आमदारांची बैठक घेऊन मुख्य नेते व गटनेते म्हणून एकनात शिंदे यांची निवड केली आहे. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना युबीटी पक्षांच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना युबीटी पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आलीय. त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना (Aditya thackeray) मोठी जबाबदारी देण्यात आलीय.

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर,भास्कर जाधव यांच्याकडे शिससेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आलीय. उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि निकवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारासोबत झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोदम म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना युबीटीतील निर्णय होतील.

महाविकास आघाडीत शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार
राज्यातील विधानसभेच्या निकालाने महाविकास आघाडीचं पाणीपतं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, राज्यात भाजप महायुतील तब्बल 236 जागांवर स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना शिंदे गटानेही तब्बल 57 जागांवर विजय मिळवला असून गत कार्यकाळात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते, त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे 20 आमदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर 16 जागांसह काँग्रेस असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे.

राज्यातील संख्याबळ, कोणत्या पक्षाला किती जागा
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
———————
भाजपा- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

जन सुराज्य शक्ती- 2

राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1

राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1

एमआयएम- 1 जागा

सीपीआय (एम)- 1

पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1

राजर्षी शाहू विकास आघाडी- 1

अपक्ष- 2