मुंबई, दि. २६ नोव्हेंबरः भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या समवेत विविध शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या संविधानाचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श आणि संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरिता संविधान प्रास्ताविकेचे/उद्देशिकेचे अनन्यसाधारण महत्व आहे. यास्तव भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान दिनाचे औचित्य साधून शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. आज आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ५०० हून अधिक स्वयंसेवक, लेझिम पथक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.