समाजशास्त्रीय चिंतन व संशोधनातून समाजातील प्रश्नांची उकल व्हावी- एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांचा सूर

0
13

मुंबई, दि. २७ जानेवारीः सामाजिक शास्त्रातील संशोधन हे जीवनाच्या जवळ आणि व्यक्ती व समाज यांचा आरसा असावा अशी अपेक्षा असल्याने समाजातील खरे प्रश्न आणि त्यांची वस्तुनिष्ठ उत्तरे ही या संशोधनातून पुढे यायला हवीत तसेच अशा प्रश्नांची उकल या संशोधनातून व्हावी असा मान्यवरांचा सूर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत उमटला. सामाजिक शास्त्र दैनंदिन जीवनात स्पर्श करीत असल्याने विद्यार्थी व संशोधकांनी एक वेगळी वाट चोखाळली तर संशोधन अर्थपूर्ण व उपयोगाचेही होईल असेही प्रतिपादन मान्यवरांनी केले. मुंबई विद्यापीठ, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद पश्चिम विभागीय केंद्र आणि राष्ट्रीय सेवा भारतीच्या सहयोगाने आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांनी त्यांची मते मांडली. ‘इन्वेस्टिगेटींग द इम्पॅक्ट ऑफ सोशिओ इकोनॉमिक एन्व्हार्यनमेंट ऑन एकेडमिक रिसर्च अँड आऊटकम्सः अ पॉलिसी ओरिएन्टेड एप्रोच’ या संकल्पनेवर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री जे. के. बजाज, आयसीएसएसआर चे सदस्य सचिव प्रा. धनंजय सिंह, राष्ट्रीय सेवा भारतीचे विजयराव पुराणिक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरु प्राचार्य डॉ. अजय भामरे, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद पश्चिम विभागीय केंद्राच्या संचालिका प्रा. कविता लघाटे, पश्चिम सेवा क्षेत्र प्रमुख प्रा. उपेंद्र कुलकर्णी, सेंट्रल युनिव्हर्सिटी अजमेर, राजस्थान येथील प्रा. मकरंद पैठणकर आणि प्रा. भारती गोरे दिल्ली विश्वविद्यालय यांचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामीण विकास, कौशल्य विकास, शहरी भागातील वंचित दुर्बल घटक आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या उपसंकल्पांवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या सेवाभावी आणि सामाजिक संस्थांबरोबर सहकार्य करार करुन संशोधन प्रकल्प पुढे नेण्याचा उद्देश या परिषदेमध्ये ठरविला गेला.
25 वर्षे काम करणारे अनेक सेवाभावी संस्था कार्यकर्ते यांनी आपले ग्रामीण भागातील कौशल्य आधारित उत्पन्न वाढीचे प्रयत्न, महीला सक्षमीकरणाचे यशस्वी प्रयोग, माता बालक सुपोषण , ऍनिमिया मुक्ती चे प्रकल्प, दुर्गम भागातील आरोग्य सेवा या विषयी आपले विचार मांडले.
या विषयातील माहिती विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना देण्याची तयारी दाखवली.
पद्मश्री जे के बजाज यांनी भारतीय दृष्टिकोनातून संशोधनाचा विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. भारतीय ज्ञान परंपरा या साठी महत्वाची आहे आणि त्याचा अभ्यास विद्यापीठ रचनेत झाला पाहिजे हे त्यांनी लक्षात आणून दिले.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी नालंदा सारख्या प्राचीन विद्यापीठांची परंपरा आणि विविध प्रकारच्या करागिराकडे असलेले ज्ञान याचा उल्लेख करून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता मांडली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला अभिप्रेत असलेले असे अनेक नवे मार्ग विद्यार्थ्यांना समाजाप्रती जागरूक बनवतील. तसेच समुदाय सहभाग कार्यक्रम, फिल्ड प्रोजेक्ट, कार्यांतर्गत प्रशिक्षण, आंतरवासिता आणि अप्रेंटिशिप यामाध्यमातून संवेदनशील आणि सुजाण नागरिक घडविण्याची प्रक्रिया सुलभ होईल असेही मान्यवरांनी त्यांच्या सादरीकरणा दरम्यान सांगितले. या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी ३०० हून अधिक संशोधक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सेवा संस्थांच्या कार्याची माहिती देणारी स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आली.