35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई व विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण राबवा– वनमंत्री...

वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई व विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी सुधारित धोरण राबवा– वनमंत्री नाईक

0
62

blank

मुंबई, दि. ११: अभयारण्य परिसरातून विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन अधिक प्रभावी आणि मानवतावादी पद्धतीने करण्यासाठी सुधारित धोरण आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विस्थापित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे इतर ठिकाणीही विशेष पथके गठीत करण्यात यावीत. अशी पथके गठीत करण्यासाठीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या.

blank

मंत्रालय येथे वन विभागाची १०० दिवस कृती आराखडा पूर्ततेबाबत आयोजित बैठकीत मंत्री नाईक बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर विवेक खांडेकर, उपसचिव (वने) विवेक हौशिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( उत्पादन व व्यवस्थापन) एम. श्रीनिवास राव,प्रधान मुख्य वन संरक्षक एम. एस. राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर  व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वनमंत्री नाईक म्हणाले की, येत्या १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन करुन झालेल्या कामांचा परिपूर्ण अहवाल सादर करावा. या शंभर दिवसात विस्थापित समुदायांच्या पारंपारिक जीवनशैलीचा आदर करून त्यांच्या पुनर्वसनाची योग्य ती कार्यवाही करावी. वाघ, बिबट्या गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित आभासी भिंत यंत्रणा उभारण्याची प्रकिया पूर्ण करण्यात यावी. बिबट्यांना जेरबंद करून ठेवण्यासाठी निवारा केंद्रांची क्षमता वाढवण्यात यावी, अशा सूचनाही वनमंत्री नाईक यांनी केल्या.

पीक नुकसान, पशुधन हानी प्रकरणात अर्ज सादर करण्यासाठी मोबाईल ॲप सुविधा तयार करावी. मानव वन्यजीव संघर्ष नियंत्रित करण्यासाठी समर्पित जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी पारंपारिक देवराईचे जतन करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी, असे निर्देश वनमंत्री नाईक यांनी यावेळी दिले. राज्यातील वनांच्या कार्बन फायनान्स निर्मिती क्षमतेची मोजणी करण्याबाबतच्या प्रस्तावाला गती देण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.वाघ शिकार प्रकरणात अटक केलेल्यांची सखोल चौकशी करावी. तपासणी करण्यासाठी अन्य संबंधित विभागांची मदत घ्यावी, अशा सूचनाही वनमंत्री नाईक यांनी दिल्या.

blank