मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त : मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानाची बाब

0
25

केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र  शासनातर्फे रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून 500 पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने यांच्या पुढाकाराने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.

           या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी भाषिकांचा अभिमान वाढला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या इतर भाषांमध्ये तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया यांचा समावेश आहे.

           महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला. महाराष्ट्रीयन भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती. मराठीचा भाषिक प्रवास प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री, प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. या भाषा वेगवेगळ्या नसून तिची रुपे मराठी या एकाच भाषेची आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे.

         मराठीत उपलब्ध असलेला आणि दोन हजार वर्षे जुना असलेला ग्रंथ म्हणजे ‘गाथासप्तशती’ अथवा ‘गाथा सत्तसई’ हा आहे. तो ग्रंथ दुसऱ्या शतकातील सतरावा सातवाहन राजा व कवी ‘हाल’ याने लिहिला आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे तीस हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध आहेत. त्यांतील ऐंशी ग्रंथ दीड ते दोन हजार वर्षे इतके जुने आहेत. त्यांत प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे नियुक्ती (तिसरे शतक) आदींचा समावेश आहे. शेकडो मराठी शब्द रामायण-महाभारतातही सापडतात. विनयपिटक, दीपवंश, महावंश या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषांत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मराठी भाषेतील पहिला शिलालेख दोन हजार दोनशेवीस वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या आधीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतील आहे. तो शिलालेख पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटात सापडला. तसेच मराठीतील ‘लीळाचरित्र’ व ‘ज्ञानेश्वरी’ याग्रंथांना युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा दिलेला आहे.

            मराठी भाषेच्या भौगोलिक क्षेत्रात पासष्ट प्रकारच्या विविध बोली आहेत. साहित्यात त्या बोलींच्या उपयोजनेमुळे ‘प्रमाण मराठी’ दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे. मराठीतील एक घटकबोली अहिराणी ही माझी बोली. ती इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून बोलली जात असल्याचे सांगितले जाते. प्रमाणभाषा मराठीही तितकीच जुनी असल्याचे  सांगण्यात येते.

           अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ही एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असे वर्णन करण्यात आले आहे.

        अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे काम करतात. तसेच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

                   हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि एक लढाई यशस्वी झाली. आपल्या मराठी भाषिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे.

 अभिजात भाषेसाठी असलेले निकष-

  • पुरातन साहित्य: संबंधित भाषेचा इतिहास किमान 1500 ते 2000 वर्षांचा असावा आणि तिचे प्राचीन साहित्य आजही उपलब्ध असावे.
  • समृद्ध साहित्य परंपरा: या भाषेत असे साहित्य असावे जे प्राचीन काळापासून अलीकडच्या काळापर्यंत अस्तित्वात आहे आणि त्याचे महत्त्व सिद्ध झालेले आहे.
  • मूळ भाषा: संबंधित भाषा स्वतःची स्वतंत्र असावी, म्हणजेच इतर कोणत्याही भाषेपासून थेट उधार घेतलेली नसावी.
  • सांस्कृतिक महत्त्व: भाषा त्या समाजातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असावी.

 * मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे फायदे-

  • भाषेचा संवर्धन आणि संरक्षण: सरकारकडून मराठी भाषेच्या संशोधनासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निधी मिळेल. त्यामुळे मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्राचीन साहित्याच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • शोधकार्याला प्रोत्साहन: अभिजात भाषांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर विशेष अनुदाने आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातील.
  • शैक्षणिक विकास: मराठी भाषेतील प्राचीन साहित्य, संस्कृती, आणि इतिहास यांचे अधिकाधिक शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश होईल, ज्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेचा अधिक खोल अभ्यास करता येईल.

        मराठी भाषेला मौलिकता, अखंडता आणि सलगता परंपरेने होतीच. तिच्यात कुठलाही कालिक खंड आढळत नाही. मराठी भाषेत ‘लीळाचरित्र’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांसारखे अभिजात ग्रंथही आहेत. अभिजात म्हणजे श्रेष्ठ. मराठी भाषेचे आधुनिक रुप हे तिच्या अर्वाचीन रुपापेक्षा वेगळे असले तरी त्यांच्यातील आंतरिक नाते स्पष्टपणे अधोरेखित होते. प्राचीन मराठी भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांची सांगड तिच्या व्याकरणासह सहज घालता येते. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरकालीन (तेरावे शतक) मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा, शिवकालीन (सतरावे शतक) भाषा आणि एकविसाव्या शतकातील भाषा ही एकच आहे. अठराव्या शतकातील मराठी भाषा आणि आताची मराठी भाषा यांत थोडाफार भाषिक फरक असला तरी ती भाषा एकच आहे आणि फक्त भाषाशास्त्राच्या नियमानुसार कालप्रवाहामुळे तिचे हे बदल झाले आहेत हे सहज स्पष्ट होते.

         मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठीच्या बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल, संशोधन आणि साहित्यसंग्रह करण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा दर्जा उंचावला गेला आहे आणि तिच्या जतनासाठी आणि प्रसारासाठी अनेक नवे मार्ग खुले झाले आहेत.

      मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणे, या भाषांमधील पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचे प्रकाशन तसेच डिजिटल माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

          मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचे योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा निश्चितच मिळेल अशी मला खात्री आहे.

     संकलन श्वेता पोटुडे,प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया