रामकृष्ण हरी कृषि प्रतिष्ठान तर्फे तारा भवळकर यांना जीवन गौरव तर डॉ. बुधाजीराव मुळीक यांचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव
सांगली : जमिन आणि पाणी नसेल तर बाकीच्या कितीही अत्याधुनिक गोष्टी आणल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. पाणी व जमिनी ही माणसाची जैवीक ओढ आहे त्याचे महत्व ओळखून प्रदुषण रोखण्याचे भान येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रा. ताराबाई भवाळकर यांनी केले. रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार आणि कृतज्ञता पुरस्कार प्रदान समारंभात त्या बोलत होत्या.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठानच्या वतीने ताराबाई भवाळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, तुकोबांची पगडी, तुकांबांचे उपरणने, तुकोबांची गाथा, तुळशीचं रोप, मानपत्र व पंचविस हजार रूपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच कृतज्ञता पुरस्काराने कृषिरत्न डॉ. प्रा. बुधाजीराव मुळीक यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह, तुकोबांची पगडी, तुकांबोंचे उपरणने, तुकोबांची गाथा, तुळशीचं रोप, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी आमदार उल्हासदादा पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
यावेळी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील, देहूचे सरपंच मधूकरमहाराज मोरे, युवा नेते सचिन बराटे उपस्थित होते. रामकृष्ण प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरी चिकणे, उपाध्यक्ष संजय बालगुडे, खजिनदार नाथाभाऊ कुदळे, राजीव जगताप, सुनिल महाजन, उध्दव भडसाळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्रतिमा पुजन व वृक्ष पुजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागत प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त राजीव जगताप यांनी केले. संस्थेचे सचिव मंदार चिकणे यांनी आभार मानले. सौ. माधवी पाटील यांनी कृतज्ञता पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. मिराताई चिकणे यांनी जीवनगौर पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. विजयदादा कडणे यांनी सूत्रसंचालन केले.
तारा भवाळकर म्हणाल्या, जमीन आणि पाणी याच दोन गोष्टी माणसाच्या मूलभूत आधार आहेत. जन्माला आल्यापासून आपलं अस्तित्व सिध्द करायचं असेल तर जमिन लागते. जमिन नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. म्हणूनच पायाखालची जमिन सरकली अशी म्हण आहे. म्हणजे सगळे आधार तुटले. जमिन आणि पाणी नसेल तर बाकीच्या कितीही अत्याधुनिक गोष्टी आणल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. याचे भान माणसांना कधी येणार? ते भान आणण्याचे काम रामकृष्ण हरि कृषी प्रतिष्ठान करत आहे. रामकृष्ण मोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मंत्री असताना शैक्षणिक क्षेत्रात मोठे योनदान दिले आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा निश्चित अभिमान आहे. जमीनीपासून माणूस तुटत चालला आहे त्यामुळे तो असुरक्षीत होत आहे. परावलंबी होत आहे. माती आणि पाण्याची ओढ ही जैवीक ओढ असून ती आपण कधी समजून घेतल्या नाहीत. आपण फक्त संताची वचने सांगतो पण त्याचा उपयोग करत नाही. वृक्षवल्ली असतील तर आपल्याला एकटेपणा वाटणार नाही. सगळ्याच जुन्या गोष्टींचं उदात्तीकरण करायचं नाही याचा अर्थ त्याच्याबरोर चांगलही सोडून द्यायचं असं नाही.
डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी शेती आणि शेकतकर्यांची केलेल्या चवळवळीची माहिती दिली. शेतकरी हाच जगाचा बाप आहे. त्यामुळे त्याचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे. शेतकरी फक्त शेतात पिकणार्या मालाचा भाव मागतो. परंतु तो पिकवत असणार्या पिकांमुळे पर्यावरण संतुलीत राहते. ऑक्सिजन निर्माण केला जातो. त्याचा कोणी विचार करत नाही. शेती टिकली तरच जग टिकणार आहे. असे सांगितले.
रामदास फुटाणे यांनी आपल्या खुमासदार शैलीतील काव्या रचनांनी उपस्थितांची मने जिंकली. माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी रामकृष्ण मोरे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील साहित्यिक व शेतकरी उपस्थित होते.