गोंदियासह १३ जिल्हे संपूर्ण हागणदारीमुक्त करणार-ना.लोणीकर

0
15

२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान राज्यात महास्वच्छता अभियान

– मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

मुंबई, दि. ११ : राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अधिक गतिमान करण्यासाठी येत्या २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख भेटी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास प्रेरित केले जाणार आहे. त्याबरोबरच येत्या वर्षभरात राज्यातील गोंदियासह १३ जिल्हे संपूर्णत: हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंत्रालयात बुधवारला पत्रकार परिषदेत दिली.

आजच्या कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले असून सर्व पालकमंत्री, पालक सचिव यांनी या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशनला गती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहितीही मंत्री श्री. लोणीकर यांनी यावेळी दिली.

राज्यातील सिंधुदुर्ग हा संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला असून ७ हजार ३०४ ग्रामपंचायती आणि १५ तालुके पुर्णत: हागणदारीमुक्त झाले आहेत. या अभियानाला यापुढील काळात अधिक
गतिमान करण्यात येणार असून येत्या वर्षभरात राज्यातील कोल्हापूर,रत्नागिरी, सातारा, ठाणे, सांगली, पुणे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर, पालघर आणि जालना हे १३ जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याशिवाय, येत्या २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान शौचालये नसलेल्या १८ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना शौचालय बांधण्यास
प्रेरित केले जाणार आहे. यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम,गृहभेटी, आयईसी कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शौचालयाच्या आवश्यकतेविषयी जनजागृती असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व पालकमंत्री, पालक सचिव, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, स्वयंसेवी संस्था, कलाकार आदींच्या सहभागातून या
अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप देऊन लोकांपर्यंत शौचालयाचे महत्व पोहोचविले जाईल. महात्मा गांधी जयंती दिनी अर्थात २ ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘महास्वच्छता दिन’ साजरा करुन या मोहिमेला अधिक गतिमान केले जाणार आहे,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सिंधुदूर्ग हा संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त झाला. यासह ७ हजार ३०४ ग्रामपंचायती आणि बल्लारपूर (जि. चंद्रपूर), आजरा, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी (सर्व जिल्हा कोल्हापूर), मुळशी (जि. पुणे), लांजा (जि. रत्नागिरी), महाबळेश्वर (जि. सातारा), देवगड, कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला (सर्व जिल्हा सिंधुदूर्ग) हे १५ तालुके पुर्णत:हागणदारीमुक्त झाले.

·