23.2 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज ‘सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ’-राजाराम जी 

छत्रपती शाहू महाराज ‘सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ’-राजाराम जी 

0
38
महापुरुषांच्या विचारांचा ‘बसप’च खरा वारसदार
 
सांस्कृतिक कार्यक्रम,पोवाडे,मर्दानी खेळांनी ‘राजर्षी शाहू महोत्सवा’ची सांगता

 कोल्हापूर-देशात हजारो वर्षांपासून विषमता,भेदभावाचा सामना करणाऱ्या दलित, पीडित, वंचितांसह बहुजन समाजाच्या ‘सामाजिक न्याया’चा खरा पाया रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्ष,पश्चिम महाराष्ट्र झोनच्या वतीने इर्विन मल्टीपर्पज सभागृहात गुरुवारी (ता.२६) ‘राजर्षी शाहू महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.महोत्सवापूर्वी शाहूनगरीतून काढण्यात आलेल्या ‘कार रॅली’मुळे शहर बसपामय झाले होते, हे विशेष.विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे आणि मर्दानी खेळांनी महोत्सवाची सांगता झाली.शहरातील विविध ऐतिहासिक स्थळ तसेच चौकांमध्ये जयंती निमित्त बसपकडून लाडू वितरित करण्यात आले.

सकाळी बिंदू चौक येथील महामानव महात्मा ज्योतीराव फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी, माजी खासदार मा.राजाराम जी यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली.सकाळी १०.३० वाजता शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.शाहू महाराजांनी बांधलेल्या ‘मिस क्लार्क’ वसतिगृहात यावेळी मा.सुश्री बहन मायावती जी यांच्या कडून देण्यात आलेल्या देणगी संदर्भात नाम फलकाचे उदघाटन देखील करण्यात आले.

इर्विन मल्टपर्पज सभागृहात आयोजित राजर्षी शाहू महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका निशा भगत आणि विशाल यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.दयानंद मेटकर यांच्या चमू च्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर यांच्या जीवनपटावर सादरीकरण करण्यात आले.तर, सुश्री बहन मायावती जी यांच्यासारखी वेशभूषा धारण करीत नागपूर च्या कलाकारा कडून करण्यात आलेले सादरीकरण आणि पोवाडे-मर्दानी खेळांनी सर्वांचे लक्ष वेधले.

देशाला आरक्षणाचा मार्ग दाखवणाऱ्या भूमितील सुजाण नागरिकांनी आरक्षण रद्द करण्याचा घाट घालणाऱ्या राजकीय पक्षांच्या मागे उभे राहू नये.आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समानता आणणाऱ्या बसपा च्या पाठीशी उभे राहून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसपा चे नगरसेवक निवडून द्यावे, असे आवाहन मा.राजाराम जी यांनी मुख्य सोहळ्याला संबोधित करतांना केले.

पुढे बोलतांना मा.राजाराम म्हणाले, “शाहू महाराजांनी आपली राजसत्ता वापरून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना शिक्षण, रोजगार,सामाजिक समानता मिळवून दिली. हीच समता मिळवून देण्याचा विचार बसपाचा आहे.त्यामुळे शाहू महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने कोणी समोर नेत असेल तर तो बहुजन समाज पक्ष आहे”.

राजाचे पद नाकारून लोकशाही मार्गाने राज्य कारभार करणारे छत्रपती शाहू महाराज अद्वितीय होते. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना ‘सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ’ असा गौरव केला होता.छत्रपतींच्या जयंतीनिमित्त आज,सण साजरा करीत हा गौरव दिवस साजरा करण्यात आल्याचे, राजाराम म्हणाले.

छत्रपतींचे कार्यकर्तृत्व खऱ्या अर्थाने समोर आणत फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून मान्यवर कांशीरामजी यांनी शाहू महाराज केवळ कोल्हापूर संस्थानाचे नाही तर ते संपूर्ण देशाचे असल्याचे विचार मांडले. मान्यवर कांशीराम जी यांनी बसप ची स्थापना करताना महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शाहू महाराजांचा आदर्श घेतला आणि प्रेरणादायी ‘लोकराजा’ ला प्रत्येक राजकीय पक्षाला दखल घेण्यास भाग पाडले, अशा शब्दात राजाराम यांनी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.महापुरुषांच्या विचारणाचा खरा वारसा ‘बसपा’च चालवत आहे.बहुजनांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासासाठी बीएसपी सशक्त पर्याय असल्याचे प्रतिपादन राजाराम यांनी केले.

कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्र पुणे झोन प्रभारी रामचंद्र जाधव,अप्पासाहेब लोकरे, ऍड.संजीवजी सदाफुले, किरण आल्हाट, कोकण झोन प्रभारी व कोल्हापूर जिल्हा कमेटी अध्यक्ष रविंद्र कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड,सातारा जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष श्री.थारोडे, मुकुंद सोनावणे, सुनील शिंदे, राजेश चव्हाण, मनिष कावळे, बामसेफ चे रवींद्र चांदणे, अशोक रामटेके यांच्यासह राज्यभरातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष, स्टेट कमिटी मेंबर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

महापुरुषांना बसपाच योग्य सन्मान देऊ शकते-ऍड.सुनील डोंगरे
महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरी होतेय, हे श्रेय मान्यवर कांशीराम साहेब यांचे आणि बसपचे आहे.सुश्री बहनजी उत्तर प्रदेच्या मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कानपूर विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने केले.अमेठीचे नामकरण छत्रपती शाहू महाराज नगर असे केले.परंतु,त्यानंतर सत्तेवर आलेल्या समाजवादी पक्षाने ते नाव पुन्हा बदलले.अर्थात बहुजन महापुरुषांना बसपाच योग्य सन्मान देऊ शकतो, इतर कोणी नाही, असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.सुनील डोंगरे यांनी केले.

महापुरुषांच्या विचारधारेवरच ‘बसप’चा भर-डॉ.हुलगेश चलवादी
बहुजन समाज पक्षाची विचारधारा फुले-आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय व बहुजन उत्थानावर आधारित आहे. शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाचा आधार घेऊन बसपाने सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा दिला आहे. बसपा ही आरक्षणाची पुरस्कर्ती असून तिची भूमिका शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत आहे, असे मत डॉ. हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले. बसपाच्या लढ्यात शाहूंचे विचार मार्गदर्शक असून, बहुजन समाजासाठी शिक्षण, आरक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणे, हे बसपाचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

blank