‘कुपोषणावर श्वेतपत्रिका काढणार’

0
17

नागपूर : राज्यातील कुपोषणाबाबत श्वेतपत्रिका काढू, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले. आरोग्य यंत्रणेत त्रुटी असल्याची कबुली देत त्या दूर करण्यावर भर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत जाधव यांनी विदर्भातील माता मृत्यूकडे सभागृहाचे लक्ष वेधत उपाययोजनेची मागणी केली. नीलम गोऱ्हे यांनी कुपोषणाबाबत श्वेतपत्रिका काढणार का, असा सवाल केला. त्यावर निवेदन करताना सरकार श्वेतपत्रिका काढणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी

जाहीर केले. यापूर्वीच्या सरकारने उचललेली पावले व विद्यमान

सरकार करणार असलेल्या उपाययोजनांचाही त्यात समावेश असेल, असे ते म्हणाले.

विदर्भात एका वर्षात २०८ मातांचा मृत्यू झाले असून त्याची कारणे वेगवेगळी आहेत. आदिवासी भागात मातांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात. त्यात जननी सुरक्षा योजना, नवसंजीवनी योजना आणि मानव विकास योजनांचा समावेश आहे. जननी सुरक्षा योजनेत मातेला ५०० रुपये भत्ता आणि उपचारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी २०० रुपये अतिरिक्त दिले जातात. त्याचप्रमाणे नवसंजीवनी योजनेत ८०० रुपये आणि मानव विकास योजनेत ४,००० रुपये भत्ता दिला जातो.

डोंगराळ भागातील महिलेला प्रसुतीच्या आठ दिवस आधीच वैद्यकीय उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी नेले जाते. राज्यात एकूण ४ लाख ३ हजार ४०७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो, असे सावंत म्हणाले