मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी पुन्हा एकदा जनतेला सकारात्मक संदेश दिलाय. बुधवारी (27 ऑगस्ट) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेतलं. दरम्यान, तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं आले होते.
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: फोन करत उद्धव ठाकरेंना गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान, 2003 मध्ये श्रीकांत ठाकरे यांच्या निधनाच्यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या आधीच्या निवासस्थानी आले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी दाखल झाले.
शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बाप्पाकरता आकर्षक सजावट : राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीकरता शिवतीर्थ हे अतिशय सुंदर पद्धतीनं सजवल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरे हे दरवर्षी आपल्या घरी असलेल्या चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात दुरावा आल्यानं उद्धव ठाकरे हे कधीही शिवतीर्थवर आले नव्हते. मात्र, आता गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या घरी आले आहेत. या सगळ्यामुळं मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.



