महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील- महादेव जानकर

0
4
वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘केज कल्चर प्रणाली’तून रोजगाराच्या मुबलक संधी

मुंबई, दि. ६ : पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज
कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी
नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज केले.

तारापोरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जानकर
बोलत होते. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागाचे सचिव विजय कुमार,
मत्स्यविकास आयुक्त मधुकर गायकवाड, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे
कार्यकारी संचालक अरुण शिंदे उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले की, केज कल्चरच्या माध्यमातून
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख उद्देश असून त्या माध्यमातून
रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशात आंध्र प्रदेश
मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
येत्या काळात महाराष्ट्राला देशात मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर
आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी
सांगितले.

‘केज कल्चर’ प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये
यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना
राबविण्यात येणार आहे. आदिवासी असलेला कातकरी समाज हा मत्स्यव्यवसायात
असून मत्स्यव्यवसायाच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान
उंचावण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.

श्री. खोतकर यावेळी म्हणाले की, मत्स्यव्यवसाय धोरण व कार्यप्रणाली
आखण्यात आली आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन १.५ मेट्रिक टन असून
येत्या एका वर्षात ते दुपटीने वाढवून ३ मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे
उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले.