गोपीनाथगडाची उभारणी पुण्याचे ‘गार्डियन’ करणार

0
12

पुणे – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणा-या परळी येथील गोपीनाथगडाची जबाबदारी पुण्याच्या ‘गार्डियन मीडिया अँड एन्टरटेनमेंट’ या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. मुंडे यांचे कार्य आणि त्यामागील विचारधारा, यांचे दर्शन घडवणारे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे, असे मनोगत ‘गार्डियन’चे व्यवस्थापकीय संचालक मनीष साबडे यांनी व्यक्त केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृत्यर्थ गोपीनाथगडाच्या उभारणीचा भूमिपूजन व पायाभरणी समारंभ नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकासमंत्री व मुंडे यांच्या कन्या पंकजा यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी मनीष साबडे यांनी नियोजित गोपीनाथगड स्मारकाचा आराखडा, रचना यांचे सादरीकरण केले. ‘बाबांचे स्मारक बीड परिसरातील गडांच्या परंपरेला साजेसे असावे,’ अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच गोपीनाथगडाची उभारणी केली जाईल, अशी ग्वाही साबडे यांनी दिली.

साबडे पुढे म्हणाले, गार्डियनकडे देशी-विदेशी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारके, थीम पार्क उभारण्याचा अनुभव आहे. डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक, दक्षिण कोरिया आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारके गार्डियनने उभारली आहेत. गोपीनाथगड स्मारकही त्या निकषांनुसार उभारले जाई, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारके नेहमीच प्रेरणास्रोत ठरतात. त्या व्यक्तीच्या कार्याची परंपरा अखंडित ठेवण्याची आठवण ती करून देतात, याची जाणीव ठेवून गोपीनाथगड स्मारक पूर्ण केले जाईल.

विविधांगी स्मारक
नियोजित स्मारकाचे सर्व तपशील लवकरच जाहीर केले जातील. मुंडे यांची गाजलेली भाषणे, चळवळीतील कार्य, छायाचित्रे, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांची विचारधारा यांना अग्रक्रम देत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गोपीनाथगड स्मारकात केला जाईल. समाजाप्रती असलेली आपली उत्तरदायित्वाची भावना जागृत राहावी, अशी त्याची रचना असेल