मुंबई : मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव असल्याच्या आरोप यापूर्वी विरोधी पक्षांनी केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सात पानी पत्र पाठवून पवारांनी समिती स्थापण्यास कडाडून विरोध केला आहे. स्वत: मोदी यांनीही अशा समितीचे प्रमुखपद स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.
मुंबईसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचा प्रकार हा महापालिका आणि राज्य शासनाच्या कारभारात केंद्राचा थेट हस्तक्षेप असल्याचा आरोपही शरद पवार यांनी या पत्रात केला आहे. ७४व्या घटनादुरुस्तीनुसार मुंबई महापालिकेचे काम चालते. तिचे बजेटही देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. देशाच्या संघराज्य प्रणाली धक्का देण्याचा हा प्रकार असून पंतप्रधानांनी या समितीचे अध्यक्षपद स्वीकारू नये, असे आवाहनही पवारांनी पत्राद्वारे केले आहे. हा निर्णय घेताना मंत्रिमंडळ, मुंबई महापालिकेला आणि तेथे सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही विश्वासात घेण्यात आले नाही, असा दावा पवारांनी केला आहे. ही समिती म्हणजे राज्यात विचारवंत, योजनाकर्ते आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यांची कमतरता असल्याचे द्योतक असल्याचा टोलाही पवारांनी लगावला आहे