उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. या भावूक प्रसंगी त्यांचे चिरंजीव जय पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या विसर्जनासोबतच राष्ट्रवादी परिवारातर्फे काढण्यात आलेली देशव्यापी ‘अस्थि-कलश यात्रा’ देखील पूर्णत्वास गेली. हरिद्वार येथून सुरू झालेली ही राष्ट्रव्यापी यात्रा प्रयागराजच्या संगमावर विसर्जित झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात उत्तरप्रदेशातील भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्रिवेणी संगमाच्या व्हीआयपी घाटावर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात अस्थींचे पूजन करून त्या प्रवाहित करण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी आपल्या लाडक्या दादांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.





