सातारा-पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. ‘तारा’ आणि ‘चंदा’ या दोन वाघिणींच्या यशस्वी पुनर्वसनानंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ‘हिरकणी’ (STR-06) ही तिसरी वाघीण कोयना अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आली.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून ५ फेब्रुवारी रोजी या वाघिणीला जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर रस्तेमार्गे प्रवास करून तिला सह्याद्री प्रकल्पात आणण्यात आले. विशेष म्हणजे, कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात पोहोचवण्यासाठी तिला बोटीने प्रवास घडवण्यात आला. शुक्रवारी रात्री तिची आरोग्य तपासणी करून तिला अन्न देण्यात आले आणि आज शनिवारी पहाटे ६ वाजता तिला मुक्त जंगलात सोडण्यात आले.

कोयना अभयारण्यात आधीपासूनच ‘बाजी’ (STR-03) नावाचा नर वाघ वास्तव्यास आहे. आता हिरकणीच्या आगमनामुळे येथे वाघांच्या वंशवृद्धीला मोठी मदत होणार आहे. याशिवाय चांदोली परिसरात ‘सेनापती’ आणि ‘सुभेदार’ या वाघांसोबत ‘तारा’ व ‘चंदा’ या वाघिणी आधीच दाखल झाल्या आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ११६५ चौरस किमीच्या या प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी शासन ‘ऑपरेशन तारा’ सारखे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. या नव्या पाहुणीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधता समृद्ध होण्यासोबतच व्याघ्र पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.





