24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home महाराष्ट्र ९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

९.८४ लाख मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
26
मुंबई, ता.९ : राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‘पिंक ओपीडी’चा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे झाला.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एचपीव्ही लसीकरण हा त्याच दिशेने टाकलेला मोठा आणि स्तुत्य पाऊल असल्याचे सांगितले.”
त्यांनी सांगितले की, राज्यातील ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस देण्याची ही व्यापक मोहीम राबवली जात असून त्यामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालता येईल. जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावले उचलत आहे.
*माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित*
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ या उपक्रमाची आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, त्या मोहिमेत ३ कोटी महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास १० हजार महिलांमध्ये कर्करोगाचे प्रारंभिक निदान झाले. आजार पहिल्या टप्प्यात सापडल्यामुळे अनेक माताभगिनींचे प्राण वाचवणे शक्य झाले, याचा खरा आनंद आहे.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मेमोग्राफी तपासणीच्या आठ गाड्यांद्वारे गावागावात तपासणी सुरू असून आतापर्यंत २ कोटी ९१ लाख महिलांची तपासणी झाली आहे. गरज5 भासल्यास आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी डीपीडीसी, जीएसआर तसेच राज्याच्या आरोग्य बजेटमधून निधी उपलब्ध करण्याचा विचार करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यातील अनेक रुग्णालयांच्या इमारती ६० ते ७० टक्के पूर्ण झाल्या असून त्या लवकरात लवकर १०० टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कमी व्याजदरात निधी मिळवण्यासाठी एडीबी बँक, वर्ल्ड बँक यांसारख्या संस्थांकडूनही आर्थिक सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
तसेच पीपीपी (Public Private Partnership) मॉडेलद्वारे आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. नामांकित संस्थांच्या सहकार्याने आधुनिक आरोग्य सुविधा उभारल्या जातील, ज्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही मिळेल.
मुख्यमंत्रीपदाच्या काळात राबवलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, या मोहिमेमुळे सुमारे ५ कोटी नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला.
याच धर्तीवर आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे आणली असून आरोग्य सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रयत्न केला जाणार आहे.
आरोग्यमंत्री असताना दुर्गम भागातील दौऱ्यांचा अनुभव सांगताना शिंदे म्हणाले की, राज्याच्या सीमेवरील रंगुबेली सारख्या दुर्गम गावांमध्येही त्यांनी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. स्वातंत्र्यानंतर कोणीही मंत्री त्या भागात पोहोचला नव्हता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.
या अनुभवातून दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ७० ते ८० हजार रुग्णांना सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत देण्यात आली, अशी माहिती शिंदे यांनी दिली. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या निधीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना मदत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, ‘लाडकी लखपती योजना’, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत तसेच नावासमोर आईचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय यांचा उल्लेख केला.
“महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब आणि समाज मजबूत राहतो. घराचा कणा ही आई, बहीण आणि पत्नी असते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला डॉक्टर, शल्यचिकित्सक, परिचारिका आणि आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला.
महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सांगताना शिंदे यांनी जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांचे उदाहरण देत महिलांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील एचपीव्ही लसीकरण देशभर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
राज्यात ९ ते १४ वयोगटातील ९.८४ लाख मुलींना एचपीव्ही लस देण्याचा हा मोठा उपक्रम असल्याचे सांगून शिंदे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.
“आपल्या एका प्रयत्नातून एखादा जीव वाचला तर त्यामागील संपूर्ण कुटुंब वाचते. त्यामुळे आरोग्य विभाग हा खऱ्या अर्थाने जीव वाचवणारा सेवाधर्मी विभाग आहे,” असे सांगून त्यांनी या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
0000

blank