राज्यात दारूबंदी शक्‍य नाही – बावनकुळे

0
6

नागपूर – संपूर्ण राज्यात तातडीने दारूबंदी करता येणार नाही. त्यासाठी आधी अभ्यास करावा लागेल, असे स्पष्टीकरण उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिले.

दारूबंदी सुधारणा विधेयकास मान्यता देण्यापूर्वी झालेल्या चर्चेत बोलताना कॉंग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनी गुजरातच्या धर्तीवर राज्यात दारूबंदी करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूबंदीच्या निर्णयाचे तंतोतत पालन करण्यात येईल. अवैध दारूवर नियंत्रणासाठी आता गावपातळीवर ग्रामरक्षक दल राहील. त्यांना कायदेशीर मान्यताही दिली जाणार आहे. गावातील 25 टक्‍के महिलांनी निर्णय घेतल्यास ग्रामरक्षक दल उभारले जाईल. तहसीलदारांच्या उपस्थितीत ग्रामसभेत 11 सदस्यांच्या ग्रामरक्षक दलाला मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामरक्षक दलाला कायदेशीर आधार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. चर्चेत अमरसिंग पंडित, हरिसिंग राठोड सहभागी झाले होते. चर्चेनंतर महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयकाला मान्यता देण्यात आली.