अखेर एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर

0
8

नागपूर दि. 14 : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांच्या एक सदस्यीय समितीसमोर हजेरी लावली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास खडसे नागपुरात झोटिंग समितीसमोर वकिलासह हजर झाले.साधारण 40 मिनिटांच्या चौकशीनंतर खडसे बाहेर आले. याप्रकरणाची पुढील चौकशी 21 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 21 फेब्रुवारीलाही खडसेंना नागपुरात हजेरी लावावी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन पदाचा दुरुपयोग करून नातेवाईकांना दिल्याचा आरोप राज्याचे माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झाला. याप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती डी. झोटींग यांची एक सदस्यीय समिती गठित केली. नागपुरातील रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मधून झोटिंग चौकशी समितीचे कामकाज सुरू आहे. गेल्या सात महिन्यापासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यान समितीने औद्योगिक विभाग आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. दोन्ही विभागाच्या प्रधान सचिवांनाही समिती समोर हजेरी लावली होती. या चौकशीला होत असलेल्या दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने सुुद्धा नाराजी व्यक्त करीत शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान समितीकडून आता उलट तपासणी सुरू करण्यात आली आहे. खडसे, महसूल आणि औद्योगिक विभागाकडून आपआपला युक्तीवाद वकिलामार्फत समितीसमोर ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी खडसेंना उलट तपासणीसाठी चौकशीने नोटीस बजावली असून समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु आजवर त्यांनी वकीलांमार्फत बाजू मांडल्याने ते स्वत: हजर होतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता एकनाथ खडसे हे त्यांचे वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अमोल पाटील यांच्यासह न्या. झोटिंग समितीच्या कार्यालयात हजर झाले. तब्बल पाऊन तास त्यांनी आपली बाजू मांडली. १२.४० मिनिटांनी ते समितीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार खडसे यांनी आपल्या साक्षी पुराव्याचे अ‍ॅव्हीडेन्स अ‍ॅफीडेव्हीड सादर केले. यावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. २१ तारखेलाही एकनाथ खडसे स्वत: उपस्थित राहणार आहेत.