शहरांचे उत्पन्न वाढवण्याची गरज

0
6

अलिबाग-राज्यातील शहरांचा सर्वागीण विकास होणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी निधी अपुरा असून ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. शहरांच्या विकासासोबतच त्यांचे आर्थिक उत्पन्नही वाढण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
अलिबाग नगरपालिकेच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शहरांच्या विकासाच्या मुद्दय़ाला हात घातला. ‘राज्यातील ४८ टक्के लोक २४८ शहरात राहतात त्यामुळे या शहरांच्या सर्वागिण विकास होणे गरजेचे आहे. पण २ लाख २० हजार कोटींच्या राज्याच्या अर्थसंकल्पातील ६ हजार कोटींचा निधी नगरी प्रशासनावर खर्च केला जातो. हा निधी अत्यंत अपुरा आहे. आगामी काळात ही परिस्थिती बदलावी लागणार आहे,’ असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांंत राज्यातील २५ शहरांचे आराखडे विकास राज्य सरकारकडे प्रलंबित होते. त्यामुळे शहरांचे बकालीकरण सुरु झाले होते. मुख्यमंत्रीपदाची सुत्र मी हाती घेतल्यानंतर २३ विकास आराखडय़ांनी दोन आठवडय़ात मंजूरी दिली. पुणे आणि कल्याण शहरांच्या विकास आराखडय़ांना लवकर मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमएमआरडीएने वेगवेगळ्या विकास योजना राबविताना नगरपालिकांना विश्वासात घेणे गरजेच असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार पंडीत पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधिक्षक शशिकांत महावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला बचत गटांचे सक्षमीकरण गरजेचे
ज्या जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला आहे. त्यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल त्यांनी समाजाच्या दोन्ही अंगाचा विकास केला. मानव संसाधनाच्या विकासात त्यांनी महिलांना सहभागी करून घेतले त्यामुळे त्यांच्या विकासाला गती आली. आपण महिलांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. महिलांच्या उपक्रमशिलतेला संस्थात्मक दर्जा देणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी चीन पटर्न राबवा’ असे आवाहन त्यांनी केले. नगरपालिका आणि स्थानिक बँकांच्या मदतीने गावागावात महिला बचत गट, मॉल्स तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.