शिष्यवृत्ती अफरातफरीचा संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा

0
16

गडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत चामोर्शी येथील स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेच्या संचालकाने १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रूपयाची अफरातफर केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र संस्थाचालक सूरज बोम्मावार (रा. सावली जि. चंद्रपूर) याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत तंत्रशिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेला विविध अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रदान उपलब्ध करण्यात आली. मात्र या रक्कमेत बोगस विद्यार्थी दाखवून खऱ्या विद्यार्थ्यांची रक्कम हडप केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गडचिरोलीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी २३ डिसेंबरला सदर महाविद्यालयातील दस्ताऐवजाची प्रत्यक्ष तपासणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत प्रकल्प अधिकाऱ्यांना अफरातफर झाल्याचे आढळून आले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात संस्थाचालक सूरज बोम्मावार याच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली.
चामोर्शी पोलिसांनी विद्यार्थ्याची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बोम्मावार याच्याविरूध्द ४०९, ४२० कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
काय आहे नेमका घोटाळा?

स्व. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजी या संस्थेत ज्या विद्यार्थ्याचे नाव दाखविण्यात आली व त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीची उचल करण्यात आली. परंतु ती शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना आजतागायत वाटप करण्यात आली नाही. यात २०१३ व २०१४ मध्ये डिप्लोमा इन थ्रीडी अ‍ॅनिमेनेशन ग्राफिक्स कोर्सकरिता १२० विद्यार्थी क्षमता असताना संस्थेने २०९ विद्यार्थ्यांची नोंदणी दर्शवून सदर अभ्यासक्रमाची ४४ लाख ७३ हजार ९९० एवढी शिष्यवृत्तीची रक्क्म आदिवासी विकास विभागाकडून व ६१ लाख ५७ हजार २५ रूपयाची रक्कम समाज कल्याण विभागाकडून उचल केली. दोनही विभागाकडून १ कोटी ६ लाख ३१ हजार १५ रूपयाची उचल करून शासनाची फसवणूक केली.