निवासी डॉक्टरांनी उपसले बंदचे हत्यार

0
15

मुंबई, दि. 20 – राज्यातील निवासी डॉक्टरांना होणा-या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. सायन रुग्णालयात शनिवारी रात्री सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. दरम्यान, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आश्वासन केईएमचे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिलं आहे.
दरम्यान, सायन निवासी डॉक्टर मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. मात्र या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी रविवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून मासबंक केला आहे. तर रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातही निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी निषेध नोंदविला.औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. डॉ. उमेश काकडे आणि डॉ. विवेक बडगे असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत .

डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० ची परिणामकारक अंमलबजावणी करा
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
निवासी डॉक्टरांना सुरक्षीत वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावा.