आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस

0
8

मुंबई,दि.३: संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी भाजपचे आमदार अनिल गोटे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विधानपरिषद बरखास्त करावी अशी सरकारची किंवा पक्षाची भूमिका नसताना तुम्ही वारंवार अशी वक्तव्य का करत आहात? असा सवालही त्यांना विचारण्यात आला आहे.
तसेच तीन दिवसात या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे अन्यथा कारवाई होईल. अशा स्पष्ट शब्दात गोटेंना सुनावण्यात आले आहे. विधानपरिषद बरखास्त करा अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटेंनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानपरिषदेमध्ये उमटले होते. अनिल गोटेंनी विधानसभेत बोलताना विधानपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढण्यात आले होते.
दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत बोलताना नाराजी व्यक्त केली होती. ‘गोटेंचे वक्तव्य हे सभागृहाच्या उंचीला शोभणारे नसल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोटेंना सुनावले होते. अनिल गोटेंनी विधानपरिषद बरखास्तीची मागणी केल्यानंतर सर्व पक्षातून टीकेची झोड उठली. त्यानंतर या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन सादर केले होते. यावेळी त्यांनी गोटेंचे वक्तव्य सरकारला आणि वैयक्तिक आपल्यालाही आवडले नसल्याचे सांगितले होते. संविधानाने हे सभागृह तयार झाले आहे, कोणाच्या सांगण्यावरून ते तयार झालेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्याने या सभागृहाबद्दल कुठलीही द्विधा मन:स्थिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते.