उद्धव ठाकरेंना झेड सुरक्षा कायम,मात्र प्रफुल पटेलांची काढली

0
10

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नारायण राणे यांची विशेष सुरक्षा व्यवस्था काढून घेतानाच पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण आणि आर. आर. पाटील अशा पाच माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्था अचानक काढून घेतल्या आहेत.
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना झेड तर इतर मंत्र्यांच्या दर्जानुसार वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था दिली जात होती. मात्र सरकारने अचानक आदेश काढून सुरक्षेत तातडीने कपात केली. यापूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती. त्यात कपात करून आता ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवली आहे. तर राष्ट्रवादीचे नेतेमाजी मंत्री प्रफुल पटेल सुनील तटकरे, पतंगराव कदम, जयंत पाटील यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा होती. तिचा एक स्तर कमी केला आहे.
हे तर सुडाचे राजकारण..
केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सुडाचे राजकारण करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिल्यानंतर काही तासांतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर मंत्र्यांकडे असलेला स्टाफ तातडीने काढून घेऊन बंगले आणि कार्यालये तातडीने रिकामे करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. आता माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘झेड’ सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कपात केलेली नाही.
समितीचा निर्णय – मुख्यमंत्री
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पुरविण्यात येणा-या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समिती स्थापन केली होती. त्यात पोलीस महासंचालक, गुप्तचर विभागाचे अधिकारी यांचा समावेश होता. या समितीने आढावा घेऊन सुरक्षा कपातीची शिफारस केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समितीचा आहे. सरकारचा यात कोणताही संबंध नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत.