दोन दशलक्ष भीम ॲप डाऊनलोड करण्याचे लक्ष- राजकुमार बडोले

0
16

महाड,दि.१3- ६ एप्रिल या भारतीय जनता पार्टी स्थापना दिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कालावधीत देश पातळीवर विशेष अभियान राबवण्यात येत असून सदर कार्यक्रमाची सांगता १४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना यासंबधीची माहिती दिली.
सशक्तीकरण आणि गरीब कल्याण या विषयावर सदर अभियानाचा केंद्र बिंदू असून आमदार प्रवास या संकल्पनेनुसार पक्षाचे आमदार विधानसभा मतदार संघात प्रवास आणि मुक्काम करत आहेत. प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव आणि महाड विधानसभा मतदार संघाला प्राधान्य देण्यात आले आहे. आमदार प्रवास कार्यक्रमांतर्गत जिल्हा व मंडल पदाधिकाऱ्यांच्या बैठका सोबतच एक सार्वजनिक कार्यक्रम, पत्रकार परिषद, जाणत्या लोकांशी चर्चा, सामान्यांच्या जीव्हाळ्याच्या प्रश्नासोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांची माहिती देण्यात येत असून भीम ॲपची उपयोगीता आणि त्याच्या प्रचारावर भर देण्यात येत आहे. सदर कार्यक्रामात सर्व मंत्री, पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, असे सर्व सहभागी होत असल्याचेही बडोले यावेळी म्हणाले.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणाजे दोन दशलक्ष भीम ॲप जनतेने डाऊनलोड करावेत यासाठी भारतीय युवा मोर्चा  व सोशल मिडीया कार्यरत आहे. यासाठी  बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान दहा हजार मोबाईलधारकांनी भीम ॲप डाऊनलोड करावे असे लक्ष निश्चित करण्यात आले असून  भीम ॲप डाऊनलोड करणारांचा डाटाही तयार करण्यात येत असल्याचे  तसेच दोन दशलक्ष भीम ॲप मोहिमेंतर्गत सर्वाधिक नागरिकांना प्रोत्साहित करणाऱ्या जिल्ह्यातील एका कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचेही बडोले यावेळी म्हणाले.