Home महाराष्ट्र दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचा पुढाकार

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी काँग्रेसचा पुढाकार

0

मुंबई- राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारकडे मांडून त्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय बैठका आणि जिल्हानिहाय दौ-यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. मराठवाडा विभागाची बैठक औरंगाबादेत तर विदर्भ विभागाची बैठक १२ जानेवारीला अमरावती येथे होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात नापिकी व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी व दुष्काळी उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय समित्या स्थापन केल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.
विदर्भाच्या समितीचे दौरे या पूर्वीच सुरू झाले आहेत. १२ जानेवारीला अमरावती येथे विदभार्तील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रमुख नेते व पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मराठवाडा विभागीय दुष्काळ पाहणी समितीचा दौरा पाच जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर दक्षिण अफ्रिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांच्या अधिकारांसाठी यशस्वी लढय़ानंतर महात्मा गांधींच्या मायदेशी आगमनाची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला असून, त्यानिमित्ताने येत्या ९ जानेवारीला मुंबईत प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Exit mobile version