इटानगर (अरुणाचल प्रदेश) – अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण लोकसंख्येच्या तब्बल 30 टक्के लोक एचआयव्ही बाधित असल्याची धक्कादायक माहिती राजीव गांधी विद्यापीठातील सहायक प्राध्यापक बिकाश बागे यांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे.
एचआयव्ही एड्सबाबत थायलंडमध्ये 27 आणि 28 डिसेंबर रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बागे यांनी अरुणाचल प्रदेशच्या सामाजिक संदर्भाबाबत आपला अभ्यास सादर केला. त्यामध्ये त्यांनी एचआयव्हीच्या संसर्गाचे विविध घटकांची माहिती दिली आहे. बागे हे अरोग्य आणि सामाजिक पर्यावरण, लिंग आणि आदिवासी अभ्यास तसेच शाश्वत आणि समुदाय विकासाचे अभ्यासक आहेत. अरुणाचल प्रदेशमधील अभ्यासाअंती बागे यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये बहुविवाह पद्धती तसेच मजेने केलेले संबंध यामुळे एचआयव्हीचा प्रसार होत असून एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून आला असल्याचे म्हटले आहे. मात्र विकृत संबंधांना प्रतिबंध आणि सदाचरणाचा प्रसार अशा प्रयत्नांमुळे एचआयव्हीच्या प्रमाण रोखण्यात सरकारला काही अंशी यश मिळाले आहे. भौगोलिक समस्या तसेच संवादातील अडथळ्यांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये योग्य तो आरोग्याच्या सुविधा पोचविणे हे अद्यापही स्वप्नच असल्याचेही बागे यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य सुविधा या केवळ उच्चउत्पन्न गटापर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत. समाजामध्ये एचआयव्ही बाधितांना अद्यापही भेदभावाची वागणूक देण्यात येते. त्यामुळेही एचआयव्ही/एड्स बाधितांना आवश्यक ते लाभ पोचविण्यामध्ये अडथळे निर्माण होतात. एचआयव्ही बाधितांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहनही बागे यांनी यावेळी केले आहे.