खारघरमधील टोलनाक्याची ‘मनसे’कडून तोडफोड

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई-सत्तेत येण्यापूर्वी टोल बंद करण्याचे आश्वासन देणाऱया राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, आजपासून वसुली सुरू करण्यात आलेल्या खारघर-कामोठेमधील टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोडफोड केली. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर असलेल्या कामोठे टोलनाक्यावरील तीन बुथची तोडफोड केली. मनसेचे मुंबई जिल्हा वाहतूक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. हे सर्व कार्यकर्ते चार गाड्यांमधून मुंबईहून आले होते.
लोकांचा विरोध असतानाही खारघर येथील टोलवसुलीला राजमान्यता मिळाली असून मंगळवारपासून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माथी आणखी एका टोलचा भार पडला आहे. हा टोलनाका ओलांडणाऱ्या वाहनांना कमीत कमी ३० ते जास्तीत जास्त २४० रुपये टोल भरावा लागणार आहे.
विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील सरसकट सर्वच वाहनांना हा टोलदंड भरावा लागणार आहे. दरम्यान, राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी हा टोल लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्याचे समजते. टोलवसुली करणाऱ्या कंपनीला सोमवारी राजपत्राची प्रत मिळाल्यावर टोलवसुलीवर शिक्कामोर्तब झाले. रोज ५० हजार वाहनांना या टोलचा फटका सहन करावा लागणार असून तब्बल १४ वर्षे हा टोलवनवास सोसावा लागणार आहे. विशेष म्हणजे पुण्याला जाताना वाशी येथे टोल भरल्यानंतर अवघ्या १६ किमी अंतरावरच हा नवा टोलनाका आहे.